सिल्लोडमध्ये बंद घर फोडून ४ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास

Foto
सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, दीड लाखांची रोकड चोरट्यांनी पळविली

सिल्लोड (प्रतिनिधी): शहरातील बापूनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बापूनगर, सिल्लोड येथील हॉटेल व्यावसायिक कैसर मोबीन सय्यद (वय ४६) हे २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पत्नी व दोन मुलांसह नातेवाइकांच्या लग्नासाठी सावळतबारा, ता. सोयगाव येथे गेले होते. दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता त्यांना नातेवाइकांचा फोन आला. त्यानंतर दुपारी सुमारे ३ वाजता ते कुटुंबासह घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. 

घरात पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडे असून लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तक्रारीनुसार चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, ४० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४८ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, ४८ हजार रुपये किमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, ८ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण तसेच १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे. 

या घटनेमुळे बापूनगर परिसरात खळबळ उडाली असून घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.